पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने सांगवीतील अनधिकृतपणे सुरु असलेल्या पाच मजली इमारतीच्या बांधकामावर मंगळवारी सकाळपासून कारवाई सुरु केली आहे. दरम्यान, या कारवाईची माहिती देण्यास कार्यकारी अभियंता मनोज सेठिया टाळाटाळ करत असून इमारत कोणाच्या मालकीची आहे. त्याचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. इमारतीचे मालक माहीत नाहीत तर कारवाई कशी केली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मधुबन सोसायटीमध्ये 30 हजार चौ.फु. बांधकाम
जुनी सांगवीतील, मधुबन सोसायटी येथील गल्ली नंबर दहा येथे एका पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरु असून हे बांधकाम चार ते पाच गुंठ्यात सुरु आहे. 30 हजार चौरस फुटाचे बांधकाम झाले आहे. या इमारतीचे काम अनधिकृतपणे सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे या इमारतीवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे पथक मंगळवारी तिथे धडकले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात सकाळपासून ही इमारत पाडण्यास सुरुवात केली असून कारवाई अजून देखील सुरु आहे.
मालक माहित नाही, तर कारवाई कशी?
दरम्यान, ही इमारत नेमकी कोणाची आहे. याचे मालक कोण आहेत, याबाबतची माहिती देण्यास कार्यकारी अभियंता मनोज सेठिया टाळाटाळ करत आहेत. इमारतीचे मालकी कोणाची आहे. संबंधित व्यक्तीचे नाव काय आहे हे सांगण्यास त्यांनी इन्कार केला. मालक माहित नसतील तर इमारतीचे बांधकाम अनधिकृतपणे सुरु असल्याचे प्रशासनाला कसे कळले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दबावामुळेच नाव सांगण्यास नकार
वास्तविक कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरु असल्यास अगोदर संबंधित मालकाला बांधकाम थांबविण्याची नोटीस पालिकेकडून दिली जाते. त्यानंतरही संबंधित व्यक्तीने बांधकाम सुरु ठेवल्यास पालिका कारवाई करते. परंतु, या इमारतीवर कारवाई सुरु असून देखील इमारत कोणाच्या मालकीची आहे यापासून अधिकारी ’गुमनाम’ आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही कारवाई नियमित सुरु असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. इमारतीच्या मालकाचे नाव सांगण्यास कार्यकारी अभियंते मनोज सेठिया यांच्यावर कोणाचा दबाव आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.