सांगवीतील पाच मजली अनधिकृत इमारत भुईसपाट

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने सांगवीत अनधिकृतपणे सुरु असलेल्या पाच मजली इमारतीचे बांधकाम भुईसपाट केले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. याप्रकरणी संबंधित बांधकाम धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी सांगवीतील, मधुबन सोसायटी येथील गल्ली नंबर पाच येथे नारायण सरवदे यांच्या पाच मजली इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम सुरु होते. हे बांधकाम एका गुंठ्यात सुरु होते. पाच हजार चौरस फुटाचे बांधकाम झाले होते. या इमारतीच्या दुस-या मजल्याचे काम सुरु असताना पालिकेने बांधकामवर कारवाई केली होती. तसेच बांधकामधारक सरवदे यांना नोटीस देऊन त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता.

मोठा पोलिस बंदोबस्त
गुन्हा दाखल असताना देखील सरवदे यांनी अनधिकृत बांधकाम सुरु केले होते. पाचव्या मजल्यापर्यंत बांधकाम केले. त्यामुळे या इमारतीवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे पथक सोमवारी तिथे धडकले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबी, पोकलेडच्या सहाय्याने ही इमारत भुईसपाट करण्यात आली. दरम्यान, सांगवी परिसरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केली आहे. गेल्या मंगळवारी जुनी सांगवीतील, मधुबन सोसायटी येथील गल्ली नंबर दहा येथेच सुरु असलेल्या एका पाच मजली इमारतीचे बांधकाम भुईसपाट केले होते.