सांगवीतील संरक्षण हद्दीतील रस्ता विकसित करा : शितोळे

0

संरक्षण विभागाकडे गेल्यावर्षीच रक्कम अदा

पिंपरी-चिंचवड : सांगवी-किवळे मार्गावरील सांगवी फाटा ते सांगवीपर्यंतच्या हद्दीतील संरक्षण विभागाची जागा पालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील रुंदीप्रमाणे विकसित करण्यासाठी संरक्षण विभागाने कळविलेली रक्कम पालिकेने 2017 पूर्वी अदा केली आहे. त्यामुळे सांगवी फाटा ते सांगवी पर्यंतच्या रस्त्याबाबत महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर काम करणे आवश्यक होते. परंतु, काम झाले नाही. त्यामुळे सांगवी येथील सांगवी किवळे बीआरटी मार्गातील सांगवी फाटा ते सांगवीकडे येणार्‍या संरक्षण हद्दीतील रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिकेकडे केली आहे.

महापालिकेकडून अद्याप काम नाही
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेने सन 2017 पूर्वी संरक्षण हद्दीतील सांगवी-किवळे मार्गावरील सांगवी फाटा ते सांगवीपर्यंतच्या हद्दीतील संरक्षण विभागाची जागा पालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील रुंदीप्रमाणे करण्यासाठी संरक्षण विभागाने कळविलेली रक्कम अदा केली आहे. त्यावेळी महापालिका व संरक्षण विभाग यांना केलेल्या पाठपुराव्यामुळे संरक्षण विभागाने सदर कळविलेला महानगरपालिका हद्दीतील इतर काही जागांचा मोबदला संरक्षण विभागास अदा केला आहे. परंतु, सांगवी फाटा ते सांगवी पर्यंतच्या रस्त्याबाबत महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर काम करणे आवश्यक होते. तथापि, सदर काम अद्यापपर्यंत झालेले नाही.

रस्ता अरूंद; वाहतूकीस अडथळा
सांगवी फाटा येथे पुण्याहून सांगवीकडे असा ग्रेड सेपरेटर व सांगवीकडून वाकडकडे जाणार्‍या अशा उड्डाणपुलाचे उद्घाटन 2017 मध्येच करण्यात आले आहे. सांगवी येथील महात्मा ज्योतिबा फुले उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरमुळे सांगवी-नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील सर्व नागरिकांची सोय चांगल्या पद्धतीने झाली आहे. सांगवीकडे येणार्‍या ग्रेड सेपरेटरमधून बाहेर पडल्यानंतर संरक्षण विभागाच्या हद्दीलगत असलेला रस्ता वाहतुकीसाठी कमी पडत असून या रस्त्याच्या मोबदला संरक्षण विभागास अदा केला आहे. परंतु, जागेवर रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीस नेहमीच अडथळा येऊन नागरिकांची अडचण होत आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना शाळेला उशीर होणे, कर्मचारी वेळेवर कामास न पोहोचणे व इंधनाचा अपव्यय अनेकवेळा होत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने विकसित करण्यात यावा, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.