सांगवी : येथील ‘राजेंद्र इलेक्ट्रॉनिक्स’ या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा लाखो रुपयांच्या महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह रिप्लेसमेंट व दुरुस्तीसाठी आलेल्या काही वस्तूदेखील आगीत भस्मसात झाल्या. या घटनेत दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिंपरी अग्निशामक दलाच्या चार अग्निशामक बंबांनी ही आग तब्बल दीड तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आटोक्यात आणली.
लाखो रुपयांचे नुकसान
या आगीत दुकानातील महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. गुढीपाडव्यासाठी दुकान मालकाने नुकतान मालाचा साठा आणलेला होता. त्यातील बहुसंख्य वस्तू दुकानातच होत्या. दुकानातील संपूर्ण माल आगीत जळाल्याने दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. दुकानाला आग लागल्याचे निदर्शनास येताच, नागरिकांनी या घटनेविषयी तत्काळ भ्रमणध्वनीवरून अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर लगेचच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे आग भडकली नाही. राजेंद्र इलेक्ट्रॉनिक्सच्या शेजारी असलेल्या दुकानांनादेखील आगीची काही प्रमाणात झळ बसल्याची माहिती मिळाली.