पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास : दोघांना अटक
पिंपरी-चिंचवड : बनावट चावी तयार करून दोघांनी घरातील तब्बल एक लाख 87 हजार, 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. श्रीमंत शिवाजी गंभीरे (वय 40, रा. श्रीकृष्ण कॉलनी, मांजरी बु, पुणे) आणि आकाश उत्तम गिरी (वय 26, रा. मलंग गल्ली, सराफा लाईन, लातूर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत नंदकुमार अरुण बनसुडे (वय 30, रा. सांगवी पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
विश्वासाच्या नात्याला तडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदकुमार बनसुडे (वय 30) व त्यांच्या पत्नी दोघेही नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. आरोपी श्रीमंत गंभीरे याने फिर्यादीला कामासाठी गाडी मागितली. फिर्यादीने गाडीची चावी दिली. गाडीच्या चावीसोबत घराची चावी देखील होती. याचा गैरफायदा घेत आरोपीने घराची बनावट चावी तयार केली. या बनावट चावीच्या सहाय्याने घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरून आरोपी आकाश गिरी याच्याकडे ठेवला. फिर्यादी यांना याबाबत संशय आल्यावरून त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सांगवी पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. सांगवी पोलिसांनी आरोपी आकाश याच्या लातूर येथील घरून एक लाख, 87 हजार, 500 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.