सांगवीत रस्त्याला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर कारवाई

0

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची मोहिम

सांगवी : सांगवी परिसरातील पिंपळे गुरव येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने नुकतीच कारवाई करण्यात आली. रस्त्याला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर कारवाई करून ती काढून टाकण्यात आली. नवी सांगवी आणि सांगवी फाटा याकडे जाणार्‍या महाराणा प्रताप चौकातील पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. याचबरोबर मनोज सेठिया वरिष्ठ अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी सांगवी येथील गंगानगर चौकात अडथळा ठरणार्‍या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.

पत्राशेड काढण्याची तयारी
पिंपरी-चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागाचे अभियंता मनोज सेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जेसीबी मशीन व पोलिस बंदोबस्तासह पिंपळे गुरव व जुनी सांगवीत ही कारवाई करण्यात आली. रस्त्याला अडथळा ठरणार्‍या पत्राशेड व ओटा बांधकाम अतिक्रमण विभागाकडुन काढण्यात आले. सुरवातीला येथील रहिवाशी नागरीकांनी पालिका अधिकार्‍यांनी कारवाई करू नये म्हणुन गळ घातली. कागदपत्रांची तपासणी व चर्चेनंतर पत्राशेडवर कारवाई करून उर्वरीत बाधीत पत्राशेड स्वत: काढून घेण्याच्या तोंडी विनंतीवरून प्रशासनाने ही कारवाई तुर्तास थांबवली आहे.

गेली पंधरा वर्षांपासून पिंपळे गुरव स.नं.50/51 या भागातील रखडलेल्या रस्ता विकासकामात काही नागरीकांच्या तक्रारी व अडथळा होता. परंतु प्रमाणपत्र ब द्वारे नागरीकांनी अडथळा ठरणार्‍या जागा लिहून देत या रस्त्यास मान्यता दिल्याने गेली पंधरा वर्षापासुन रखडलेला हा रस्ता होण्याच्या कामास मार्ग मोकळा झाला आहे. मनपा शाळा पिंपळे गुरव ते काटेपुरम चौक मयुरनगरी हा साधारण पंधराशे मिटर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम होणार आहे. यात भुमीगत गटार, पावसाळी पाण्याचे नियोजन, पदपथ, मैला वाहिन्या, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन अशा कामांचा समावेश आहे. एकुण अंदाजे 10 कोटी खर्चाच्या या कामास पालिका स्थापत्य विभागाकडून सुरूवात करण्यात आली आहे.

कामातील अडथळा दूर
महापालिकेच्या ह प्रभागाच्या स्थापत्य विभागातील अभियंता शिरिष पोरेडी म्हणाले की, पिंपळे गुरव स.नं.50 व 51 येथील रस्ता गेली पंधरा वर्षांपासुन रखडला होता. नागरीकांच्या मान्यतेने येथील अडथळा दूर करून कामास सुरूवात करण्यात आली.