सांगवीमध्ये विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

0

खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन

नवी सांगवी : सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात रविवारी विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, सामाजिक संघटना, मित्र मंडळांच्यावतीने शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. जुनी सांगवी येथील मधुबन मित्रमंडळाच्यावतीने सकाळी शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मधुबन मित्र मंडळ आयोजित शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने जेष्ठ सदस्य रविन्द्र ओव्हाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी कौस्तुभ पाटील व अजय कसबे यांनी शिवचरीत्रावरील पोवाडे सादर केले. मंडळाचे संस्थापक विजय ढोरे, आर. डी. जावळे, रविन्द्र गायकवाड, पराग ढोरे, सुधाकर पवार, नरेंद्र चौधरी, दिपक होनमाने, विनायक शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंडळाचे अध्यक्ष गणेश ढोरे यांनी केले.

अभिनव तरूण मंडळ संयुक्त जाणता राजा प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त मोफत दुचाकी पि. यु. सी. करण्यात आली. सांगवी पोलिस ठाण्याचे बलभिम ननावरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. मंडळाचे चेतन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाचशे दुचाकी वाहनांची मोफत पी. यु. सी. चाचणी करण्यात आली. सुहास कुंभार, अमित खरात, यांनी परिश्रम घेतले. येथील सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्यावतीने महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात खेळ पैठणीचा कार्यक्रमात महिलांसाठी पैठणी, सोन्याची नथ, पंखा अशा भेटवस्तु देण्यात आल्यात. याचबरोबर सांगवी प्रतिष्ठान, अखिल सांगवी गावठान ,पिंपळे गुरव येथील शिवाजी चौकात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी परिसरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. जवळकर नगर येथेही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याठिकाणी अमर आदियाल, शाम जगताप, तानाजी जवळकर व कार्यकर्ते उपस्थित होते.