बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची कारवाई
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने सांगवी आणि चिखलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी (दि. 8) रोजी ही कारवाई करण्यात आली. सांगवीतील नऊ आणि चिखली येथील सात अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला. या कारवाईने अनधिकृत बांधकामे करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
एकूण 16 बांधकामांवर कारवाई
सांगवी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली होती. या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी कारवाई केली. यामध्ये सांगवीतील नऊ बांधकामे पाडण्यात आली. महापालिकेचे उपअभियंता दीपक कुंभार, कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक, एक जेसीबी, एक ब्रेकरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. चिखली, नेवाळे वस्ती येथील सात अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली. यामध्ये 13 हजार 306 चौरस फूट बांधकामे पाडण्यात आली. कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, उपअभियंता संजय खरात यांच्या पथकाने तीन जेसीबी, एक ट्रक, तीन ब्रेकर, महापालिका कर्मचार्यांच्या सहकार्याने ही कारवाई केली.