सांगवी : पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचर्याची समस्या गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यालगत ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या नियमितपणे साफ होत नसल्याने त्या ओसंडून वाहत आहेत. कचराकुंड्यांतील कचरा रस्त्यावर इतरत्र पडलेला आहे. साचलेला कचरा कुजल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
या ठिकाणी समस्या बिकट
पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौकाजवळ 60 फुटी रस्त्याने जाताना विजयराज कॉलनी येथे रस्त्यालगत ठेवलेली कचराकुंडी ओसंडून वाहत आहे. कचराकुंडीतील कचरा वेळेवर उचललेला नाही. त्यामुळे नागरिकांकडून कचराकुंडीलगतच रस्त्यावर कचरा फेकला जात आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे साचलेल्या कचर्यातून येणार्या दुर्गंधीचा त्रास रस्त्याने ये-जा करणार्यांना होत आहे. शिवाय आजूबाजूच्या परिसरात राहणार्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशाच प्रकारची समस्या नवी सांगवी येथील शनि मारुती मंदिर, मयूरनगरी सोसायटी, काटेपूरम चौक, पीडब्लूडी कॉलनी, जुनी सांगवी आदी ठिकाणी निर्माण झाली आहे.
मोकाट जनावरांचाही त्रास
कचराकुंड्या कचर्याने भरून वाहत असल्याने मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. अनेकदा कचरा टाकण्यासाठी येणार्या नागरिकांच्या अंगावर ही मोकाट जनावरे धावून जातात. नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा, परिसरातील कचरा नियमितपणे उचलावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
नगरसेवकांना नाही देणे-घेणे!
सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात कचर्याची समस्या गंभीर झालेली असताना स्थानिक नगरसेवकांना त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न सोडविण्याकडे नगरसेवकांनी दुर्लक्ष केले आहे. काही नगरसेवक तर प्रभागात फिरकतही नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.