६ महिन्यापूर्वी ३० वर्षीय युवक बेपत्ता असल्याची पोलिसात नोंद; सांगाडा या युवकाचा असण्याची शक्यता
धुळे । साक्री तालुक्यात निजामपूर-जैताणे शिवारातील एका शेतात शनिवारी २३ रोजी मानवी सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा सांगाडा महिलेचा आहे की पुरुषाचा? हा नैसर्गिक मृत्यू आहे की हत्या? याचा शोध घेण्यासाठी आणि डीएनए चाचणीसाठी पोलिसांनी सांगाड्याचे काही अवशेष व नमुने मुंबई येथील न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठविले आहेत. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या गावातून सहा महिन्यांपूर्वी एक ३० वर्षांचा युवक बेपत्ता झाला आहे. त्याचाही अद्यापपर्यंत शोध लागेलला नाही. हा जो सांगाडा सापडला आहे तो बेपत्ता झालेल्या युवकाचाच असू शकतो. त्या दिशेने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी करीत धनगर समाज बांधवांनी निजामपूर पोलीस ठाण्यात आंदोलन केले होते.
शनिवारी घटना उघडकीस
निजामपूर जैताणे शिवारात अजीतकुमार जगन्नाथ शाह यांचे शेत आहे. साहेबराव अभिमन सोनजे हे शाह यांची शेती खेडत आहेत. शनिवारी २३ रोजी शेतामधून जाणार्या नाल्यातील रस्त्यात मातीत अर्धवट पुरलेला मानवी सांगाडा आढळून आला. गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे नाल्यातून माती वाहून गेल्याने हा मानवी सांगाडा जमीनीच्यावर आला. हा सांगाडा दिसताच सोनजे यांनी निमाजपूर पोलिसांना ही माहिती दिली.
तपासणीसाठी पाठविले
पोलीस उपअधीक्षक निलेश सोनवणे, सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक ए.के.पाटील, उपनिरीक्षक हेमंत मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर सीआरपीसी १७६ अन्वये त्या मानवी सांगाड्याचा जागीच पंचनामा केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.आकडे, वळवी यांनी मानवी हाडांच्या सांगाड्याची उत्तरीय तपासणी करुन त्याचे अवषेश डीएनए चाचणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले आहेत.
घातपाताचा संशय
अहवाल आल्यानंतर सर्व स्थिती स्पष्ट होईल. साक्री तालुक्यातील जैताणे येथून गोकुळ मुरलीधर न्याहळदे (वय ३०) हा गेल्या सहा महिन्यापूर्वी बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी मुरलीधर न्याहळदे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात मिसींगची नोंद केली आहे. मुलगा गोकुळ हा नंदुरबार रोडवरील हॉटेल कृष्णा गार्डन येथून रात्री एक वाजता बेपत्ता झाला आहे. याबाबत हॉटेल मालक व नोकर यांनीच त्याचा घातपात केल्याचा संशय मुरलीधर न्याहळदे यांनी व्यक्त केला आहे.
चौकशीचे आश्वासन
जैताणे शिवारात आढळून आलेला मानवी सांगाडा हा गोकुळचा असण्याची शक्यता नातेवाईकांनी वर्तविली असून या घटनेमागील सत्यता शोधून काढावी, अशी मागणी करीत काल धनगर समाजाच्या लोकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले होते. पोलिसांनी पथक नेमून चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात विठ्ठल मारनर, अशोक मुजगे, प्रकाश बच्छाव, ईश्वर नाहीदे, दिपक बोरसे, उपसरपंच पगारे व धनगर समाजाच्या स्थानिक नेत्यांसह
ग्रामस्थांनी आंदोलन केले.