सांघिक कौशल्य दाखवत भारताची बांगलादेशवर मात

0

सिलिगुडी : उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवत भारताने बांगलादेशवर ३-१ अशी मात केली आणि महिलांच्या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. सांघिक खेळाचा उत्तम नमुना सादर करत भारतीय महिलांनी बांगलादेशला चकवीत सहज विजय मिळविला. या विजयाने भारतीय महिला संघा आत्मविश्वास दुणावला असून भविष्यातील स्पर्धांसाठी तयार असल्याचेच त्यांनी दाखवून दिले आहे.

ग्रेसने भारताचे खाते उघडले
दांगमेई ग्रेसने १२व्या मिनिटाला बांगलादेशची गोलरक्षक सबिना अख्तरला चकवत भारताचे खाते उघडले. १७व्या मिनिटाला भारताच्या कमला देवीने गोल करण्याची संधी दवडली. बांगलादेशच्या सिरत जहान शोप्नाने ४०व्या मिनिटाला गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. बरोबरी साधल्यानंतर भारताची पीछेहाट होईल असे वाटत होते मात्र उत्तरार्धात सामन्याच्या ६०व्या मिनिटाला भारताला पेनल्टी किकची संधी मिळाली.

मलिकने दिली आघाडी
या पेनल्टी किकचा फायदा घेत सस्मिता मलिकने गोल करीत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याची सात मिनिटे बाकी असताना भारताच्या इंदुमतीने गोल करीत संघाची आघाडी ३-१ अशी वाढवली. याच आघाडीच्या जोरावर त्यांनी हा सामना जिंकला व अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. या विजयानंतर भारतीय महिला संघाने आपल्या विजयाचा आनंद साजरा केला.