वरणगाव। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून आकारास येणारा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येत्या जून महिन्यात कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. यादृष्टीने सध्या प्रकल्पाच्या तिसर्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. दररोज सहा लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. सुमारे 30 हजार लोकसंख्येच्या वरणगाव शहराचा सातत्याने विस्तार होत आहे. सद्यस्थितीत शहरातील दैनंदिन सांडपाणी, मैला कोणतीही प्रक्रिया करता नाले आणि गटारींद्वारे थेट भोगावती नदीमध्ये सोडले जाते. यामुळे कधीकाळी शुद्ध पाण्याचा जलस्त्रोत असलेली नदी आता बकाल झाली आहे.
नदीचे प्रदुषण कमी होणार
ठिकठिकाणी साचणार्या सांडपाण्याच्या डबक्यांमुळे नदीला अक्षरश: गटारगंगेचे स्वरुप आले आहे. हे चित्र बदलण्यासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी वरणगाव ग्रामपंचायत असताना तत्कालिन खासदार हरिभाऊ जावळे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सहकार्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास मंजुरी मिळाली होती. सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पास दोन वर्षापासून गती मिळाली. आतापर्यंत दोन टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून तिसर्या टप्प्यात नदीपात्रातील खडखडीजवळ सांडपाणी प्रकल्प उभारणी सुरू आहे. संपूर्ण काम दोन महिन्यात पूर्ण होऊन जूनपर्यंत तो कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
सांडपाण्यावर प्रक्रिया होणार
मजिप्रच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शहर आणि विस्तारित भागात सांडपाणी निचर्यासाठी गटारींचे बांधकाम झाले. प्रभाग क्रमांक 16, 10, 17, 18, 14 येथे गटारींची कामे झाली. दुसर्या टप्प्यात सांडपाणी एकत्रित करण्यासाठी विहिरीच्या आकाराच्या टँकचे भोगावती पात्रात काम सुरू आहे. वरणगावात आकारास येणार्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात दररोज सहा लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करता येईल. प्रक्रिया केलेल्या या पाण्याचा पुनर्वापर कसा करायचा? हा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार नगरपालिकेस असतील. याद्वारे पालिकेला पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोतदेखील तयार करता येईल. त्यामुळे प्रकल्प महत्त्वाचा आहे.