सांडपाण्यामुळे विमल हौसिंगचे आरोग्य धोक्यात

0

नंदुरबार । शहरापासून जवळच असलेल्या आदिवासी विद्यार्थीनीच्या वसतिगृहातील सांडपाण्यामुळे विमल हौशिंग सोसायटीत राहणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. नंदुरबार शहराच्या पूर्व दिशेला म्हणजे चौपाळे गावाकडे जाणार्‍या रस्त्याला लागूनच विमल हौसिंग सोसायटी उभारण्यात आली आहे, या सोसायटीत सुमारे दीडशे ते दोनशे कुटुंब राहतात. होळ गावाच्या शिवारात येत असलेला हा परिसर अगदी शांत आणि पर्यावरणमुक्त असा आहे, परंतु या सोसायटी जवळच शासनाने बांधलेल्या आदिवासी मुलीच्या वस्तीगृहामुळे डोकेदुख ठरत आहे. दक्षिण दिशेला टेकडीच्या कुशीत वसतिगृह बांधण्यात आले असून या वसतिगृहाचे सांडपाणी विमल हौसिंगमध्ये शिरत असल्याने डास मोठ्या संख्येने वाढले आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गटारीतील पाण्याचा निचरा करा
मिळालेल्या माहितीनुसार या वसतिगृहात सुमारे चारशे ते पाचशे विद्यार्थी राहत असून परिणामी वस्तीगृहाचे सांडपाणी एका पाईपलाईन ने सोडण्यात आले आहे, सांडपाण्याच्या निवारणासाठी जागा नसल्याने ते सांडपाणी विमल हौसिंगच्या दिशेने येते. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे विविध साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करू लागले आहेत, याची दखल घेऊन प्रशासनाने वस्ती गृहाचे सांडपाणी योग्य दिशेने काढण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.