मुंबई – सांताक्रुज येथे अनुराग शिवकुमार पांडे या 24 वर्षांच्या तरुणावर ब्लेडने हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या अनुरागवर जवळच्या व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. पूर्ववैमस्नातून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पळून गेलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. अनुराग पांडे हा सांताक्रुज येथील गोळीबार, सातवा रोडवरील राजबळी दुबे चाळीत राहतो. एका खाजगी कंपनीत कामाला असलेला अनुरागचे काही दिवसांपूर्वी यातील एका तरुणासोबत वाद झाला होता. याच वादातून शुक्रवारी रात्री दहा वाजता अनुरागवर या तरुणासह त्याच्या दोन मित्राने ब्लेडने वार केले. त्यानंतर लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी तेथून पळून गेले होते. स्थानिक रहिवाशांनी जखमी झालेल्या अनुरागला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. पळून गेलेल्या तिघांचा आता पोलीस शोध घेत आहेत.