मुंबई । मुंबईत मशीद बंदर परिसरात पालिकेने नुकतीच धडक कारवाई केली होती. दुसर्या दिवशी कनार्क बंदर येथेही कारवाई करून फेरीवाल्यांना पळवून लावले. सांताक्रुझ पश्चिम भागातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई हाती घेऊन रेल्वेस्थानकाच्या परिसरातील सुमारे दीडशेहून अधिक फेरीवाले तसेच वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली. सांताक्रुझ पश्चिम रेल्वेस्थानक परिसर तसेच येथील टिळक रोड, एम.जी.रोड आणि कानुभाई देसाई मार्गावरील सुमारे 40 स्टॉल्स आणि पदपदपथावरील वाढीव 150 बांधकामांवर कारवाई करण्यात आली. पदपथावरील या स्टॉल्ससह वाढीव बांधकामे तोडण्यात आल्यामुळे स्थानक परिसरातील पदपथ पादचार्यांना तसेच रेल्वे प्रवाशांना चालण्यास मोकळ्या झाल्या आहेत.
सर्व विभागांची संयुक्त कारवाई
महापालिका एच-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका देखभाल विभाग व परवाना विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. 72 कामगारांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एक जेसीबी आणि सहा ट्रकचा वापर करण्यात आला. दुय्यम अभियंता प्रमोद भोसले, वरिष्ठ परवाना निरीक्षक गरतुला, परमार तसेच देखभाल विभागाचे सहायक अभियंता सय्यद आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
वांद्रातील नर्गिसदत्त झोपडपट्टीवर कारवाई
वांद्रे पश्चिम येथील नर्गिसदत्त झोपडपट्टी आणि रंगशारदा नाट्य गृहाच्या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर ही शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे. नर्गिसदत्त नगर झोपडपट्टीतील सुमारे 40 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करून या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती एच-पश्चिम विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे.