नागरी हक्क सुरक्षा समितीची मागणी
पिंपरी- पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी पालिकेच्यावतीने सद्यस्थितीत एकही हॉल अथवा नाट्यगृह उपलब्ध नाही. त्यामुळे पालिकेच्यावतीने हॉल उपलब्ध करून देण्याची मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीच्यावतीने मानव कांबळे, दिलीप काकडे, प्रदीप पवार, उमेश इनामदार, गिरिधारी लढ्ढा, प्रताप लोके, अशोक मोहिते आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.
नाट्यगृहांचे नुतनीकरण सुरू
त्यात म्हटले आहे की, शहरात 6 ते 7 मोठे सांस्कृतिक हॉल्स, नाट्यगृहे व समाज मंदिरे आहेत. याठिकाणी नागरिक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ शकतात. परंतू, चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, संत तुकाराननगर येथील आचार्य अत्रे सभागृह नूतनीकरणासाठी बंद आहे. तर पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृह पालिकेने सांकृतिक कार्यक्रमाला देणे बंद केले आहे. त्याठिकाणी पालिकेचे अतिक्रमण विभागाचे कार्यालय आणण्याचा डाव आहे. त्यामुळे नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी हॉल नाही. नागरिकांनी एकत्र येऊच नये अशी योजना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आखत आहेत. त्यामुळे आयुक्तांना त्वरित आदेश देऊन पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील हॉल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत.