सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध

0

चेतन तुपे यांचे प्रतिपादन : धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानतर्फे आयोजित दत्तजयंती सोहळ्याचे उद्घाटन

हडपसर : परिसरातील नागरिक व महिलांना सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची संधी व कला दाखवण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानने केले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी केले आहे. हडपसर माळवाडी येथील धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दत्तजयंती उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्योजक सुनील दाभाडे, रमेश तुपे, उन्मेष मगर, अमर चौधरी, अनिल खरात, बाळासाहेब सुपेकर, अजय शिंदे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

गेली अठरा वर्षे माळवाडी हडपसर येथे दत्तजयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. या वर्षी आयोजित केलेल्या दत्तजयंती सोहळ्यात अभिनेत्री अश्‍विनी सरडेकर प्रस्तुत खेळ पैठणीचा, शाहीर बाळासाहेब निकाळजे यांचा ही दौलत महाराष्ट्राची हा कार्यक्रम होणार आहे. अक्रूर महाराज साखरे, बाल कीर्तनकार लक्ष्मीप्रसाद शंकर पटवारी, ह.भ.प. प्रबोधनकार संजीवनी गडाख, तसेच ह.भ.प. शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर व ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे यावेळी किर्तन होणार असल्याची माहिती दत्तात्रय तुपे यांनी दिली.

नाट्यगृह उभारणार

हडपसरमधील नागरिकांच्या सोयीसाठी करोडो रुपये खर्च करून महापालिकेच्या माध्यमातून विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाच्या माध्यमातून हडपसर व पंचक्रोशीतील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याचे काम केले जाणार असल्याचे चेतन तुपे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजन धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय तुपे, शाम ससाणे, बाळासाहेब तुपे, बाळासाहेब पांढरे, अनिल साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश ससाणे यांनी केले तर गणेश जाधव यांनी आभार मानले.