सांस्कृतिक चळवळीला बळ ; नव्या वर्षात नाट्यगृहाची अपेक्षा

0

सांस्कृतिक ; मागोवा 2018

भुसावळ (गणेश वाघ)- रेल्वेचे जंक्शन, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर प्रकल्पासोबतच सांस्कृतिक चळवळीमुळेदेखील भुसावळ शहराची सर्वदूर ख्याती पसरली आहे. कलावंतांची खाण असलेल्या शहरात हक्काचे नाट्यगृह नसल्याची कलावंतांना खंत आहे. सुमारे 25 वर्षांपासून नाट्यगृहाची मागणी होत असलीतरी राजकीय-प्रशासकीय अधिकार्‍यांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे नाट्यगृहाचे स्वप्न साकार होण्यास दिरंगाई होत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. नव्या वर्षात तरी नाट्यगृहाचा प्रश्‍न मार्गी लागेल, अशी कलावंतांना आशा आहे. डिसेंबर महिन्यात झालेला बहिणाबाई महोत्सव, 33 वर्षानंतर पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात रंगलेला ‘युवारंग’ व राज्यनाट्य स्पर्धेत चार नवनिर्मित नाटकांच्या झालेल्या सादरीकरणाने कलावंतांचा हुरूप वाढला आहे.

नाट्यगृहाचे स्वप्न व्हावे पूर्ण
भुसावळ ही कलावंतांची खाण आहे मात्र स्थानिक कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे नाट्यगृह नाही परीणामी रेल्वेच्या एकमेव श्रीकृष्णचंद्र सभागृहावर भिस्त आहे मात्र त्याचे भाडेही परवडणारे नाही मात्र शहराची सांस्कृतिक कला जिवंत ठेवण्यासाठी अनेक आश्रयदात्यांनी मदतीचा हात दिल्याने दरवर्षी विविधांगी उपक्रम यशस्वीपणे पार पडत आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या कार्यकाळात नाट्यगृहासाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी 2014 च्या पुरवणी यादीत दोन कोटी 99 लाख 94 हजारांचा निधी मंजूर केला होता तर सत्ताबदलानंतर भाजपा सरकारने पालिकेलादेखील हा निधी सुपूर्द केला मात्र जागेच्या अभावी हा निधी पडून आहे. जिल्हाधिकार्‍यांकडे नेमाडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्याधिकार्‍यांना तातडीने दखल घेण्याबाबत पत्रही दिले मात्र केवळ राजकीय श्रेयवादासह प्रशासनाच्या उदासीनमुळे हा प्रश्‍न प्रलंबित पडला आहे. नव्या वर्षात किमान ‘राजकीय श्रेय’ बाजूला ठेवून केवळ शहरातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल व सांस्कृतिक कला जिवंत राहील या हेतूने सत्ताधारी व प्रशासकीय अधिकार्‍यांनी हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी माफक अपेक्षा कलावंतांना आहे.

राज्य नाट्य स्पर्धेत भुसावळचा ‘डंका’
जळगााव येथे झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत भुसावळ तालुक्यातील कलावंतांनी तब्बल चार नवनिर्मित नाटकांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली. स्नेहयात्रीचे ‘खेळ मांडला’, ‘उत्कर्ष’चे आर्टीफिशीयल इंटीलिजन्स, दीपनगरचे ‘अडाण’ व ‘षडरूपी’ तसेच ‘क्रांती’ नाटकाचे दर्जेदार सादरीकरण करण्यात आले. या नाटकांना अभियानचे पारीतोषिकही मिळाल्याने कलावंताचां उत्साह दुणावला शिवाय मार्च महिन्यात स्नेहयात्री करंडकाच्या माध्यमातून राज्यभरातील 13 संघांनी सहभाग नोंदवत सादरीकरण केले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या ‘चालू द्या भाऊ’ या नाटकाच्या प्रयोगालाही भुसावळकरांनी दाद दिली. गत वर्षापासून महाविद्यालय स्तरावर ‘युवारंग महोत्सव’ घेण्याची परवानगी विद्यापीठाने दिल्यानंतर भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तर स्थानिक पातळीवर तब्बल 33 वर्षानंतर झालेल्या युवारंगमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.

भुसावळातील नाट्यगृह ठरू नये ‘पांढरा हत्ती’
भुसावळ नाट्यक्षेत्रात वृद्धींगत झाले असलेतरी भुसावळात नाट्यगृह नसल्याची कलावंतांना खंत आहे मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी कोट्यवधी खर्चून नाट्यगृहाची निर्मिती झाली असलीतरी त्याचे भाडे अवाजवी असल्याने सहजा-सहजी कलावंत तेथे जाण्यास धजावत नाही त्यामुळे भुसावळात नाट्यगृहाची निर्मिती झालीतरी हे नाट्यगृह ‘पांढरा हत्ती‘ कलावंतांसाठी ठरू नये, अशी माफक अपेक्षाही कलावंतांमधून व्यक्त होत आहे. नवीन वर्षात राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सत्ताधारी व प्रशासनाने तातडीने नाट्यगृहासाठी जागा निवडून हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.