फैजपूर । महाविद्यालयीन युवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुरु केेला युवारंग महोत्सवाची सुरुवात येथील धनाजी नाना महाविद्यालयातील नेहरु विद्यानगरच्या भव्य ऐतिहासिक प्रांगणातून गुरुवार 19 रोजी दुपारी 2 वाजता सांस्कृतिक पथसंचलनाने होणार असून सर्व रंगमंचाची तयारी आज अंतिम टप्प्यात आहे. यासाठी युवारंगचे समन्वयक प्रा. डॉ. ए.आय.भंगाळे, प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरींसह सर्व कमिटी सदस्य परिश्रम घेत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये स्फुरले नवचैतन्य
धनाजी नाना महाविद्यालयाला युवारंगचे तिसर्यांदा यजमान पदाची संधी मिळाल्याने येथील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य स्फुरले आहे. कै. कुसुमताई मधुकरराव चौधरी रंगमच, कै. शकुंतलाताई जिवराम महाजन रंगमंच, श्यामला गुणवंतराव सरोदे रंगमंच, कै. सिंधूताई पार्थ चौधरी रंगमंच, सुमन चुडामण पाटील रंगमंच आणि कै. रमाताई देशपांडे रंगमंच या सहा रंगमंचांना परिसरातील कर्तबगार महिलांचे नामकरण देण्यात आले असून या रंगमंचावर विविध कला प्रकार विद्यार्थी सादर करणार आहे. धनाजी नाना महाविद्यालयाचे विद्यार्थी 17 कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदविणार असून गेल्या 15 ते 20 दिवसांपासून त्यासाठी परिश्रम घेवून सराव सुरु आहे. यासाठी त्यांना तज्ञ मार्गदर्शकांचे सहकार्य मिळत आहे. युवारंगच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या इमारतीवर रोषणाई करण्यात येणार असून या ऐतिहासिक भूमीत युवारंगमुळे सळसळत्या रक्ताच्या तरुणाईचचा आनंद द्विगुणित होणार आहे.