सांस्कृतीक चळवळीसाठी ८ डिसेंबरपासून पाच दिवस बहिणाबाई महोत्सव

0

आयोजक खासदार रक्षा खडसेंची पत्रकार परिषदेत माहिती

भुसावळ- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नामकरण करण्यात आले. या पार्श्वभुमीवर गुरुनाथ फाऊंडेशन, मुक्ताईनगरतर्फे ८ ते १२ डिसेंबर दरम्यान भुसावळात बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून सांस्कृतीक चळवळीला चालना मिळणार असल्याची माहिती आयोजक तथा खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिकेत पाटील आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. शासकिय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार खडसे म्हणाल्या की, खान्देशच्या सांस्कृतीक चळवळीला चालना मिळावी, प्रचार प्रसार होऊन बचत गटातील महिलांना आर्थिक विकासाबाबत मागर्दशन व्हावे, या हेतूने बहिणाबाई महोत्सवाचे आयेाजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात ३०० महिला बचत गटांचे स्टॉल असतील, प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक, नगर, पुणे, मुंबई आदी भागातील महिला बचतगट या महोत्सवात सहभागी होतील. भुसावळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. पाटील, महानंदाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार चैनसुख संचेती, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदू पटेल, आमदार सुरेश भोळे, आमदार सतीष पाटील, उन्मेश पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिरीष चौधरी, किशोर पाटील, माजी आमदार गुरुमुख जगवानी आदींच्या उपस्थितीत ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होईल.या महोत्सवाला सिनेकलावंतांची उपस्थिती राहिल. १२ डिसेंबर रोजी या महोत्सवाचा विजेत्यांना पारितोषिक वितरण करुन सामारोप होईल. मुख्य आयोजक तथा गुरुनाथ फाऊंडेशनच्या अध्यक्षा खासदार रक्षा खडसे तर महोत्सवाचे प्रमुख म्हणून प्रा. सुनील नेवे, सहप्रमुख प्रिती पाटील, कार्याध्यक्ष रमण भोळे, स्वागताध्यक्ष संजय सावकारे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

महिलांचा होणार सन्मान
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या १० महिलांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. खान्देशासह राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा यात समावेश असेल. तसेच विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे, शैक्षणिक संस्था यांचा बहिणाबाई स्त्री शक्ती पुरस्कार देवून गौरव केला जाईल.

कान्हदेशच्या लोकधारेचे आकर्षण

बहिणाबाई महोत्सवात सांस्कृतीक कलानिकेतन निर्मिती व मुकेश खपली दिग्दर्शित कान्हदेशची लोकधारा या ७५ स्थानिक कलावंतांचा सहभाग असलेल्या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. सण, उत्सव व शेती कामांसह ग्रामिण स्त्री चे दर्शन घडविणारे या महानाट्यासह मॅजीक शो, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, समुह नृत्य, गितगायन, पोस्टर स्पर्धा आदी स्पर्धाही होणार आहेत. विलास करंदीकर यांच्या आठवणीतील आजीची भातुकली या वस्तूंचे प्रदर्शन या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू राहणार आहे.