शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्यावतीने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यातून पालख्यांसोबत आलेल्या पदयात्री साईभक्तांच्या श्रीसाईनामाच्या गजराने अवघी शिर्डी दुमदुमुन गेली.
आज उत्सईवाच्या प्रथम दिवशी पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्या फोटोची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक व्दारकामाईपर्यंत काढण्यात आली. संस्थानचे उपाध्यचक्ष चंद्रशेखर कदम यांनी विणा, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे व सचिन तांबे यांनी श्रींची प्रतिमा व विश्वस्त आणि नगराध्याक्षा योगितताई शेळके यांनी पोथी घेवून मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी विश्वस्त अॅड. मोहन जयकर, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदिप आहेर, ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक व्दारकामाईत गेल्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. यामध्ये उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी पहिला व रुपाली तांबे यांनी दुसर्या अध्यायाचे वाचन केले. सकाळी 6.15 वाजता कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सहपरिवार श्रींची विधीवत पाद्यपूजा केली. दुपारी समाधी मंदिराशेजारील मंचावर ह.भ.प. विक्रम नांदेडकर यांचे कीर्तन झाले. रात्री श्रींची गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसरात व्दारकामाई मंडळ, मुंबई यांनी तयार केलेला श्री हनुमानचा श्रीराम-सिता भक्तीचा देखावा व विद्युत रोषणाई पाहण्याळसाठी भक्तांनी गर्दी केली होती.
आज उत्सवाचा प्रथम दिवस असल्या ने व्दारकामाई मंदिर पारायणासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात आले. संस्थान प्रशासनाने संभाव्य गर्दीचे नियोजन केलेले असल्यामुळे सर्व साईभक्तांना सुलभतेने साईबाबांच्या दर्शनाचा लाभ मिळाला. उन्हाची तीव्रता लक्षात घेवून संस्थांन प्रशासनाने दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवली. श्रीरामनवमी उत्सवाच्याा मुहुर्तावर विजया बँकेने 7 लाख 50 हजार रुपये किंमतीचे मल्टी करन्सी डेक्सटॉप बँकनोट काऊंटर/सॉर्टर मशिन संस्थानला देणगी स्वरुपात दिले. ही मशिन विजया बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर किशोर कुमार सानसी यांनी संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांच्याकडे सुपुर्त केले.