जळगाव । मन्यारखेडा परिसरातील साईनगरात एकाने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी 12 वाजेच्या पुर्वी घडली. श्रीकृष्ण रोहिदास पवार (वय-40) असे मयताचे नाव आहे. यातच सायंकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात पवार यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाईकांची रूग्णालय परिसरात मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. मुळचे बीड येथील रहिवासी असलेले श्रीकृष्ण पवार हे पत्नी मिराबाई व मुलं बबलु व शिवा यांच्यासह गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मन्यारखेडा परिसरातील साईनगरात राहत होते.
शालकाच्या लक्षात आली घटना
खाजगी वाहनावर चालक म्हणून आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करायचे. यातच गुरूवारी पत्नी मिराबाई व मुले बाहेरगावी गेले असल्याने पवार हे घरी एकटेच होते. त्यामुळे रविवारी सकाळी पवार यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. यातच सुप्रिम कॉलनी येथील शालक जिजाबा विष्णु चव्हाण हे साईनगरात आले असता त्यांना श्रीकृष्ण पवार हे गळफास घेतल्याने दिसून आले. त्यांनी लागलीच आजू-बाजूच्या रहिवाश्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नशिराबाद पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एपीआय आर.टी.धारबळे यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. यानंतर रहिवाश्यांच्या मदतीने पवार यांना खाली उतरवून जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले. सायंकाळी पवार यांच्यावर शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पवार यांचे एक ते दोन दिवसापूर्वीच पत्नीशी भांडण झाले होते. त्यातुन ही आत्महत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज नशिराबाद पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. याचा तपास पोलिस घेत आहेत.