शिर्डी: गेल्या काही दिवसापासून शिर्डी साई बाबांच्या जन्मस्थळावरून वाद सुरु आहे. परभणीतील पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. यासाठी परभणीतील काही लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केल्यानंतर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाईल अशी घोषणा केली होती. या विरोधात आजन पासून शिर्डी बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे.
बंद काळात साईबाबांचे मंदिर सुरू राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी, पर्यटकांना शिर्डी संस्थानच्या सुविधांवर अवलंबून राहावे लागणार आहे. साईबाबांचा जन्म, धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेले असतानाही अनेक ठिकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाचा दावे केले जात असून त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा प्रयत्न केला असून तो निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिर्डी ग्रामस्थांशी ते चर्चा करणार आहेत. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी याबाबत एका बैठकीचे आयोजन केले आहे. दरम्यान, साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन, मंदिरातील सर्व आरत्या व सर्व धार्मीक विधी, संस्थानचे साईप्रसादालय, सर्व भक्तनिवासस्थाने, रुग्णालये या सुविधा ही नियमीत प्रमाणेच सुरु राहणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.