शिर्डी | साईबाबा संस्थानातर्फे साईमंदिर परिसरातील लेंडीबागेजवळ संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या हस्ते रक्त संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रात शिर्डी येथील प्राचार्य शिवलींग पटणी व वर्धा येथील साईभक्त भारत बगळे यांनी रक्तदान केले. शिर्डीत दररोज 50 हजार भाविक दर्शनासाठी येतात, यातील 1 टक्का साईभक्तांनी रक्तदान केले तर रोज 500 दात्यांकडून रक्तदान म्हणजेच महिन्याला 15 हजार बाटल्या संकलित होतील, असे यावेळी डॉ. हावरे यांनी सांगितले.
देशभरात विविध रुग्णाकरीता रक्तांची अंत्यत गरज आहे. रक्ताला इतर कोणताही पर्याय नाही. या करीता तिरुपतीला जसे केसदान तसे शिर्डीला रक्तदान ही संकल्पना घेवून त्याचाच एक भाग म्हणून मंदिर परिसरात रक्तदान सुरु करण्यात आलेले आहे, असे डॉ. हावरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, याठिकाणी साईभक्तांना रक्तदान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. त्याचप्रमाणे रक्त संकलनासाठी अद्यावत स्वरुपाचे दालन असावे म्हणून मंदिर परिसरात लेंडीबागेजवळ रक्त संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. संस्थान राज्यातील 25 रक्तपेढ्यांशी संपर्क करुन येथून संकलीत झालेले रक्त त्या रक्तपेढ्यां घेवून जातील. राज्यामध्ये सुमारे 6 हजार थॅलेसेमीया आजाराचे रुग्ण असून त्यांना याचा लाभ होईल. श्री साईबाबा समाधीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त जागतिक स्तरावर वर्षभरात महारक्तदान शिबीरे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. हावरे यांनी सांगितले.
यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, विश्वस्त तथा नगराध्यक्षा योगिता शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडेपाटील, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मैथीली पितांबरे, साईनाथ रक्तपेढीचे डॉ. सुर्यकांत पाटील आदी उपस्थित होते.