साई केंद्रांवर विजय प्रकोप

0

नवी दिल्ली । भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या(साई) एकूणच कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. साईच्या काही केंद्रांची अवस्था दयनीय आहे. कोचेस देखील आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत नसल्याबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. साई केंद्रांमधील सुविधा तसेच कोचेसच्या कामगिरीबद्दलचा अहवाल त्यांनी मागविला आहे. विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी व त्यांच्या कारभारात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने राष्ट्रीय क्रीडा नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. त्याला आगामी पावसाळी अधिवेशनात मंजुरी मिळेल, अशी माहिती त्यांनी कालच दिली होती.

नियम तोडणार्‍यांना मदत नाही!
क्रीडा संघटनांनी नियमावलींचे पालन केले नाही तर त्यांना शासनाकडून कोणतीही मदत मागण्याचा अधिकार नाही. ही नियमावली तयार करण्यासाठी नऊ सदस्यांची शासकीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने सर्व खेळांचा बारकाईने अभ्यास केला आहे व संबंधित सर्व घटकांशी सविस्तर चर्चाही केली आहे. त्यांच्याकडून लवकरच याबाबत अहवाल मिळणार आहे. या अहवालानंतर मसुद्याला अंतिम स्वरूप प्राप्त होईल, असे ते म्हणाले. कोणत्याही खेळांच्या संघटनांच्या विविध पदांवर राजकीय नेत्यांनी काम करण्यास माझा व्यक्तिश: विरोध नाही असेही गोयल यांनी नमूद केले.

सुविधांची अवस्था अत्यंत बिकट
गोयल म्हणाले, मी अलीकडे रायपूरच्या साई केंद्राचा दौरा केला. साईचे केंद्र सामाजिक कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचे काम स्थानिक यंत्रणा करीत असल्याबद्दल मी आश्चर्यचकित झालो. रायपूरचे साई केंद्र राज्य शासनाच्या स्टेडियममध्ये आहे. स्थानिक महापालिका केंद्राचा परिसर लग्नसमारंभासाठी भाड्याने देते. यातून मोठ्या रकमेचा अपहार होत असावा. साई केंद्रातील सुविधांची अवस्था अत्यंत बिकट आहे. ते पुढे म्हणाले, साई केंद्रात कोचेस आहेत पण त्यांच्याकडे खेळाडू उपलब्ध नाहीत. फुटबॉलसाठी केवळ 11 खेळाडू असतील तर दोन संघ कसे तयार करणार? मी कोचेसला खडसावले. हे चालणार नाही, असेही बजावले. आम्हाला कोचेसच्या कामगिरीची समीक्षा करावी लागेल. अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत किती खेळाडू घडविले हे पाहिल्यानंतरच यापुढे कोचेसच्या वेतनात वाढ केली जाईल. याशिवाय कोचेसचा स्वत:चा फिटनेस किती आहे यावर भर दिला जाईल. साई कोचेस वेतनवाढ मागतात पण आपण किती मेहनत घेतो याचे आत्मभान बाळगत नसल्याचे मला दिसून आले आहे.

आश्रयदाते म्हणून काम
आम्ही विविध क्रीडा संघटनांचे आश्रयदाते म्हणून काम करीत असतो. या क्रीडा संघटनांच्या उत्तरदायित्वाबद्दल आम्ही क्रीडा नियमावली पुनरावलोकन समिती स्थापन केली होती. क्रीडा नियमावलीच्या शिफारशींची अंमलबजावणी ही काही अवघड गोष्ट नाही. बहुंताश सर्वच राष्ट्रीय क्रीडा संघटना त्यानुसार काम करीत आहेत. आम्ही कराटे, बॉक्सिंग, टेनिस आदी खेळांच्या राष्ट्रीय संघटनांमधील मतभेद दूर केले आहेत. आता तिरंदाजी व बास्केटबॉल या खेळांच्या राष्ट्रीय संघटनांबाबत निर्माण झालेली समस्याही लवकरच दूर केली जाईल. पदाधिकार्‍यांची वयोमर्यादा व मतदानाचे अधिकार हे दोन महत्त्वाचे मुद्दे विविध क्रीडा संघटनांना त्रासदायक वाटत आहेत. मात्र हे मुद्दे संघटनेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे आहेत,’ असे गोयल यांनी सांगितले.