सांगवी : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साई चौक येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली. साई चौक येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी निगडी प्राधिकरण कार्यकारी अभियंता संदीप खलाटे, सल्लागार अधिकारी राहूल जगताप, विद्युत विभाग कनिष्ठ अभियंता महेश कावळे आदी उपस्थित होते. साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळण-वळण असलेले परिसरातील चौक आहे. परंतु या परिसरामध्ये वाहतूक समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. या उड्डाणपुलामुळे या परिसरामध्ये आयटी कंपनी हिंजवडी हबमध्ये काम करणार्यांना व रहिवाश्यांना वाहतूक प्रश्नाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाकड, डांगे चौक, नाशिक फाटा आणि पुणेमध्ये जाण्यास अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर होऊन या परिसरातील वाहतूक कोंडीचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे .