साई मंडळ कुमार गटाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

0

मुंबई । मुंबई शहरच्या पिंपळेश्‍वर मंडळ विरुद्ध वाशिंदच्या (ठाणे) जय बजरंग क्रीडा मंडळ यांच्यातील लढतीने साई क्रीडा मंडळ आयोजित कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होईल. साई क्रीडा मंडळाच्या विद्यमाने 24 ते 28 जानेवारी या कालावधीत लोअर परेल येथील स्व. गणेश गोताड क्रीडांगण,येथे हे सामने रंगतील. महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने होणार्‍या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 15 निवडक संघांना सहभाग देण्यात आला आहे. या 15संघाची पाच गटात विभागणी करण्यात आली असून, सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. स्पर्धेला शिवसेना विभागीय आमदार सुनील शिंदे यांचा पुरस्कार लाभला आहे. या स्पर्धेत विजयी होणार्‍या संघाला रोख 21 हजार रुपये व शिवसेना प्रमुख चषक प्रदान करण्यात येईल. उपविजेत्या संघाला रोख 15 हजार व चषक,तर उपांत्य फेरीतील पराभूत संघाना प्रत्येकी रोख पाच हजार देण्यात येईल. त्याच बरोबर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट चढाईपट्टू आणि दिवसाचा मानकरी यांना देखील आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. या स्पर्धेचे उदघाटन विभागीय आमदार सुनील शिंदे यांच्या
हस्ते होणार आहे.

स्पर्धेतील गटनिहाय संघ : अ गट :उत्कर्ष मंडळ (पुणे), सध्दीप्रभा (मुंबई शहर),अंकुर स्पोर्ट्स (मुंबई शहर). ब गट : वाघजाई मंडळ (रत्नागिरी), शिवशंकर क्रीडा मंडळ (कल्याण- ठाणे),अमरहिंद (मुंबई शहर). क गट : पिंपळेश्‍वर (मुंबई शहर), जय बजरंग (वाशिंद, ठाणे), गुड मॉर्निंग (मुंबई शहर). ड गट : जय शिवशंकर (बदलापूर- ठाणे), गोल्फादेवी (मुंबई शहर), स्वस्तिक (मुंबई उपनगर). इ गट : सुरक्षा मंडळ (मुंबई उपनगर), श्रीराम कबड्डी संघ (पालघर),न्यु परशुराम संघ (मुंबई शहर).