साकरी आरोग उपकेंद्रात रुग्ण सेवेवर परिणाम

0

भुसावळ। तालुक्यातील साकरी गावातील प्राथमिक उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी थांबत नसल्याने आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी होत आहे. साकरी हे गाव आठ हजार लोकवस्तीचे आहे. आरोग्य उपकेंद्रावर लाखो रुपये खर्च करुन रुग्णांच्या सेवेसाठी येथे एक वैद्यकीय व दोन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कोणीही मुख्यालयी राहत नाही.

अनेकदा रात्री गावातील महिलांना प्रसुतीसाठी आणले जाते मात्र रात्रीच्या वेळी या ठिकाणी एकही डॉक्टर व कर्मचारी नसतो, असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी रुग्णांना आरोग्य सेवा मिळू शकत नाही.

ग्रामस्थांनी तक्रार करुनही दुर्लक्ष
उपकेंद्राची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या उदासिन धोरणामुळे आरोग्य सेवेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. उपकेेंद्राच्या खोल्या धुळखात पडलेल्या आहे. स्वच्छतेचा अभाव आहे. खिडक्यांना काचा नाही. त्यामुळे उन्हाचा तडाखा काच नसल्यामुळे बसतो. आरोग्य उपकेंद्राच्या समस्येकड कोणी लक्ष देत नसल्याच स्थिती आहे. ग्रामस्थांनी तक्रार करुनही याकडे लक्ष दिले जात नाही. ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार यांच्याशी ग्रामपंचायतमधून फोनवरुन संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.