भुसावळ : तालुक्यातील साकरी येथील रहिवासी व शेतकरी ज्ञानदेव वनराज बोरोले (52) यांचा मृतदेह शेतात आढळला असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. बोरोले हे मंगळवारी शेतात गेल्यानंतर परत न आल्याने त्याचा शोध सुरू असतानाच शेतातच त्यांचा मृतदेह दुपारच्या सुमारास आढळल्याने साकरी गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
तालुका पोलिसांनी पाहणी
घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी भेट देऊन पहाणी केली. मृत बोरोले यांच्या मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले तर पोलिसांनी इन्क्वेस्ट पंचनामा केला. मृत्यूचे कारण मात्र विच्छेदन झाल्यावरच समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे अधिक तपास करीत आहेत.