यावल । तालुक्यातील साकळी येथील केळीचे व्यापारी तथा कमिशन एजंट यांची भुसावळच्या बांधकाम व्यावसायीक सानिया कादरीसह अन्य दोघांनी 11 लाख 32 हजारात फसवणूक केल्याची तक्रार कमिशन एजंट शेख मोहियोद्दीन शेख नबी यांनी यावल पोलिसात केली आहे. आपली संमती नसतांना आपल्या नावारील केळी खरेदी विक्रीच्या परवान्याचा आधार घेऊन सानिया कादरीने रावेर तालुक्यातुन केळी खरेदी करीत शेेतकर्यांची फसवणूक देखील केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बाजारभावापेक्षा दोन पैसे जास्त देण्याचे दिले आमिष
साकळी, ता.यावल येथील शेख मोहियोद्दीन शेख नबी यांच्या तक्रारीनुसार एप्रिल महिन्यात भुसावळ येथील बांधकाम व्यवसायीक सानिया सैय्यद अली कादरी व तिचे वडील सैयद अली कादरी हेे साकळी गावातील त्यांच्या सैफूद्दिन मोहियोद्दिन व मोहियोद्दिन शेख नबी या नावाने असलेल्या केळी ग्रुपवर आले होते. आपल्यासोबत केळी व्यवसाय करण्याची ऑफर देण्यात आली मात्र सुरुवातीला आपण त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही मात्र काही दिवसांनी ते त्यांचे नातेवाईक शेख शकील शेख दगू यांना घेऊन आले व बाजार भावापेक्षा दोन पैसे देऊ जास्त देऊ, असे सांगून व्यवहारास सुरुवात करण्यात आली.
विश्वास संपादन करून केली फसवणूक
सानिया यांनी एस.के.केळीग्रुप, भुसावळ या नावाने केळी घेतली. सुरुवातीला सर्व व्यवहार सुरळीत चाललेे व वेळीच कादरी यांनी पैसेदेखील दिले. नंतर आपला विश्वास बसल्यावर त्यांना आपण इतर शेतकर्यांकडूून केळी खरेदी करून दिली यात तब्बल 11 लाख 32 हजार 586 रुपये नंतरच्या काळात त्यांनी थकवले. दरम्यान पैशासाठी शेतकरी माझ्याकडे येत असल्याने आपण भुसावळात सानिया यांच्याकडे चकरा मारत होतो मात्र पैसे मिळाले नाही.
खोटा करारनामा, आरोप
थकीत रक्कम घेण्याकरीता जेव्हा शे.मोहियोद्दीन भुसावळला गेले तेव्हा सानिया कादरी हिने आपले पैसे सावदा येथील खंडेलवाल यांच्याकडे अडकले आहे, असे सांगत आपण दोन्ही सोबत व्यापार करतात, असा करारनामा करू व तुमचे पैसे त्यानतंद देत, असे सांगत खोटा करारनामा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपल्या नावावरील केळी खरेेदीच्या परवान्याचे खोटे दस्तऐवज तयार करण्यासाठी सानियाने रावेर तालुक्यातील शेतकर्यांची केळी खरेेदी करून अनेकांची फसवणूक केली, असा आरोप देखील त्यांनी तक्रारीत केलेे आहे. यावल तालुक्यातील अट्रावल येथील शेतकर्यांनी भुसावळ येथे जावुन काही दिवसांपूर्वी कादरी यांच्या बंगल्यात तोडफोड केली होती.