साकळीतील गॅरेज व्यावसायीक नाशिक एटीएसच्या ताब्यात

0

हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधाची शक्यता : माहिती देण्यास पथकाचा नकार

यावल- तालुक्यातील साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी (29, मूळ रा.कर्की, ता.मुक्ताईनगर) या गॅरेज व्यावसायीकास नाशिक एटीएसच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. नरेंद्र दाभोळकर पानसरे यांच्या हत्याप्रकरणात वापरण्यात आलेल्या दुचाकीचा सूर्यवंशी याच्याशी संबंध तर नाही ना? असा प्रश्‍नदेखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, संशयीत सूर्यवंशी हा कट्टरवादी संघटनेचा साधक असल्याची चर्चा असून नालासोपारा प्रकरणातील संशयीतांशी त्याचा संबंध आल्याची तसेच पुण्यातील काही भागात झालेल्या रेकीतही तो सहभागी असल्याची चर्चा आहे मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. नाशिक एटीएसच्या अधिकार्‍यांनी संशयीताला ताब्यात घेत त्याचा वापरता मोबाईल, घरातील जुना मोबाईल, काही महत्त्वाची कागदपत्रे व सीडी सोबत नसल्याचे समजते.

तीन तास कसून चौकशी
साकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयामागे सूर्यवंशी याचे निवासस्थान आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पांढर्‍या रंगाचा सुमारास (एम.एच.15 ए.ए.4118) व अन्य एका दुसर्‍या वाहनात अधिकारी तसेच महिला अधिकारी धडकले. एका वाहनातून सूर्यवंशी यास ताब्यात घेवून पथक रवाना झाले तर दुसर्‍या पथकाने तब्बल तीन तास सूर्यवंशीच्या घराची झडती घेतली. या झडतीत पथकाने काही जुने मोबाईल, सीडी, कागदपत्रे व अन्य वस्तू जप्त केल्याचे समजते मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

कट्टरवादी संघटनांशी संबंधाचा संशय
मुक्ताईनगर तालुक्यातील कर्कीचा मूळ रहिवासी असलेला वासुदेव सूर्यवंशी हा गॅरेज कामानिमित्त गेल्या काही वर्षांपासून साकळीतच स्थायीक झाला आहे. त्याच्या वडीलांसह पत्नीचे निधन झाल्याने तो आईसह येथे राहतो तर आई मोल-मजुरी करून उदरनिर्वाह करते. दरम्यान, साकळीत अनेक कार्यक्रमात सूर्यवंशी याचा सहभाग राहिला असून त्याचा कट्टरवादी संघटनांशी संबंध आल्याची शक्यता आहे.