दाभोळकरांच्या हत्याकांडाशी कनेक्शनचा संशय : एटीएसच्या लागले महत्त्वाचे पुरावे
भुसावळ- यावल तालुक्यातील साकळीचा गॅरेज व्यावसायीक वासुदेव भगवान सूर्यवंशी याच्यासह त्याचा मित्र विजय उर्फ भैया उखर्डू लोधी या दोघांना नाशिक एटीएसने ताब्यात घेतल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती तर उलट-सुलट चर्चांनाही उधाण आले होते. अखेर दोघांना शनिवारी अटक करण्यात आली असून रविवारी दोघांनाही सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूर्यवंशी याने अंनिसचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडादरम्यान वाहनाची व्यवस्था केल्याचा एटीएसला संशय आहे.
सात आरोपींना आतापर्यंत अटक
20 ऑगस्ट 2013 रोजी अंनिसचे डॉ.नरेंद्र दाभोळकर हे पहाटे फिरायला निघाल्यानंतर त्यांच्यावर बांलगंधर्व रंग मंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी चार गोळ्या झाडत त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी एटीएसने आतापर्यंत या प्रकरणी वैभव राऊत, शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार या पाच जणांना अटक केली होती तर साकळीतील दोघांच्या अटकेनंतर हा आकडा आता सातवर गेला आहे. अटक आरोपीकडून जप्त केलेल्या दस्ताऐवजातून या साकळीतील सूर्यवंशीचे नाव समोर आले. त्यानुसार गुरुवारी साकळी गावातून सूर्यवंशीला ताब्यात घेतले. त्याने राज्यभरातील विविध कारवायांसाठी वाहन व्यवस्था केल्याचा संशय आहे. त्याच्या घरातील काही सीडी तसेच दोन मोबाईलही जपत करण्यात आले असून त्याने पुण्यासह विविध ठिकाणी रेकी केल्याचा संशय आहे. यात पुण्यातील सनबर्न फेस्टिवलच्या ठिकाणाचाही समावेश आहे. त्याच्या गॅरेजमधून ही सीडी जप्त करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत त्याचा मित्र विजय उर्फ भैया उखर्डू लोधी याचे नाव समोर आले. संशयीतांचा तााब आता मुंबई एटीएसने घेतला आहे.