साकळीतील बांधकाम व्यावसायीकाचा हृदयविकाराने मृत्यू

यावल : तालुक्यातील साकळी येथून कारने फैजपूरला निघालेल्या व्यावसायीकाचा रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी हिंगोणा गावाजवळ घडली. रुपसिंग गुलाबसिंग बडगुजर (63) असे मृत व्यावसायीकाचे नाव आहे.

रस्त्यातच आला हृदयविकाराचा झटका
साकळी येथील बडगुजर गल्लीत रहिवासी व बांधकाम व्यावसायीक रुपसिंग बडगुजर (63) हे गुरुवारी स्वत:च्या कार (क्रमांक एम.एच.02 बी.एम. 1743) ने सकाळी 11.30 वाजता फैजपूरला जाण्यासाठी निघाले असता अंकलेश्वर-बर्‍हाणपूर मार्गावर हिंगोणा गावाजवळ विश्वनाथ रामा किरंगे यांच्या शेताजवळ त्यांनी लघुशंकेसाठी वाहन थांबवले मात्र वाहनातून खाली उतरत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर ते जागीच गतप्राण झाले. काही प्रवाशांनी ही माहिती देताच फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या सूचनेनुसार सहायक फौजदार हेमंत सांगळे, महेंद्र महाजन, योगेश दुसाने, अरुण नमायते हे घटनास्थळी आले. त्यांनी बडगुजर यांना यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

साकळीत पसरली शोककळा
याबाबतची माहिती कळताच साकळी येथील रहिवासी तथा जिल्हा परीषदेचे माजी सभापती रवींद्र पाटील, पं.स.चे माजी सदस्य दीपक पाटील, जितेंद्र महाजन, दीपक पाटील, अविनाश निळे, योगेश खेवलकर, तुकाराम महाजन, अतुल बडगुजर, नूतन बडगुजर, मोहन बडगुजर यावलला पोहोचले. बडगुजर यांच्या मृतदेहावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता साकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.