यावल- राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी साकळी येथील एका 28 वर्षीय हॉटेल व्यावसायीक किरण निंबादास मराठे यास जळगाव येथून ताब्यात घेतले. चार तासांच्या चौकशीनंतर त्यास सोडून देण्यात आले. या आधी 6 सप्टेंबरला वासुदेव भगवान सूर्यवंशी व 7 सप्टेंबरला विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी या दोघांना नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक करून त्यांना 17 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
जळगावात घेतले ताब्यात
बुधवारी सायंकाळी जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालया समोरून एटीएसच्या एका पथकाने किरण निंबादास मराठे यास ताब्यात घेतले. किरण मराठे हा साकळी दंगल प्रकरणी संशयीत आहे व तो व त्या सोबतचे काही जण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आलेल्या चॅप्टर केससाठी आले होते. मराठे एका मित्रा बरोबर कार्यालयाच्या बाहेर चहा पिण्या करीता निघाला तेव्हा एटीएसच्या पथकाने एका वाहनातुन दाखल होत त्यास ताब्यात घेतले. रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्याची चौकशी केल्यानंतर त्यास साकळी फाट्यानजीकच्या हॉटेलजवळ सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.