यावल : तालुक्यातील साकळी येथे सोमवारी बालविवाह होणार असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर यंत्रणेने तातडीने पावले उचलत बालविवाह रोखला.
तक्रारीची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल
यावल तालुक्यातील एका गावातील 17 वर्ष व तीन महिने वय असलेल्या बालिकेचा विवाह साकळीतील तरुणाशी सोमवार, 23 मे रोजी होणार असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर या तक्रारीची पडताळणी करीता यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशीत कांबळे यांनी तातडीने बाल सुरक्षा अधिकार्यांना माहिती दिली. बाल सुरक्षा अधिकारी अर्चना आटोळे, पर्यवेक्षक कल्पना तायडे, अंगणवाडी सेविका मंगला नेवे, हवालदार विजय पाचपोळ, सिकंदर तडवी यांच्या पथकाने साकळी गाठले. गावात बाल विवाह लावण्याची तयारी सुरू असतानाच पोलिस व बाल सुरक्षा अधिकारी यांनी हा बाल विवाह रोखला. वधू-वरासह त्यांच्या कुटुंबियांना यावल पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. येथे दोघा कुटुंबीयांना कायदेशीररीत्या अशा पद्धतीने बालविवाह करणे हा गुन्हा असल्याचे समजावून सांगण्यात आलेव कायद्याचे उल्लंघण करू नये, व असे केल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी नोटीसीद्वारे समज देण्यात आली.