साकळी । साकळीसह परिसरातील शेत शिवारात शेती साहीत्यांचे चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत. यात 4 ते 5 विहीर, कुपनलीका वरील केबल तसेच लोखंडी पाईप लंपास करण्यात आले असल्याचे समजते. याप्रकरणी करवाई करण्यासाठी साकळी ग्रामपंचायतीच्या वतीने यावल पोलिस स्टेशनला लेखी पत्र देण्यात आले आहे. तथापि या भुरट्या चोरांवर कायमचा अंकुश ठेवला जावा अशी मागणी होत आहे.
रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी
साकळी शिवारातील मनवेल रोडवरील पाटाजवळील जिवन पाटील, दिनकर नेवे या शेतकर्यांच्या तसेच साकळी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या 2 कुपनलीकावरील केबल वायरी चोरी झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या असुन हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच अल्प उत्पन्नामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला असुन शेती साहित्याच्या चोर्यांमुळे शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याच भागातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पाणी पुरवठा करणार्या 2 ट्युबवेलवरील वीज पुरवठा करणार्या केबल चोरून नेल्याने गावातील पाणीपुरवठा काही काळ विस्कळीत झाला होता. अशा प्रकारच्या शेती साहित्यांच्या भुरट्या चोरींच्या घटना परिसरात घडत असतात. परंतु पोलिसांच्या चौकशीचा ससेमीरा हा मागे न लागून घेण्याच्या उद्देशाने आणि पोलिसांची शेतकर्यांबाबतची असंवेदना पाहून अनेक शेतकरी चोरींच्या घटनांची वाच्यताही कुठे करीत आहे नाही. ग्रामपंचायतीने प्रशासनाने केबल चोरीबाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी यावल पोलिस स्टेशनला लेखी पत्र दिले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.