भुसावळ : भुसावळ-जळगाव महामार्गावरील साकेगावजवळ ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी होवून झालेल्या अपघातामुळे तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ महामार्ग ठप्प झाल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले. जळगावकडून भुसावळकडे येणारे ट्रॅक्टर साकेगाव गावाजवळ उलटले. राष्ट्रीय महामार्गावरच ट्रॅक्टर आडवे झाल्याने दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली तर साकेगावपासून थेट नवोदय विद्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश वैद्य यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी धाव घेत जेसीबी मागवून अपघातग्रस्त ट्रॅक्टर बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली. या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाला नसल्याची माहिती असून अपघाताबाबत नोंदही नसल्याचे तालुका पोलीस ठाण्यातील सूत्रांनी सांगितले.