साकेगावच्या व्यावसायीकाला शेतानजीक लुटले

तीन संशयीतांनी दुचाकी अडवत डोळ्यात मिरची पूड टाकून 75 हजारांच्या रोकडसह पाच तोळे वजनाचे दागिने घेवून पोबारा

भुसावळ : दुचाकीने शेताकडे निघालेल्या साकेगावच्या व्यापारी तथा शेतकर्‍याला साकेगाव शिवारात सिनेस्टाईल दुचाकीने आलेल्या 25 ते 30 वयोगटातील दरोडेखोरांनी मारहाण करीत व डोळ्यात मिरची पूड टाकून लुटल्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत लुटारूंनी 75 हजारांची रोकड व सुमारे पाच तोळे वजनाच्या दोन चैन मिळून सुमारे तीन ते तीन सव्वा लाखांचा ऐवज लांबवला. दरम्यान, तक्रारदार विनोद परदेशी यांनी लुटारूंपैकी एकाला ओळखले असून त्याचे नाव सोनू पांडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी पसार झाला असून तो रेकॉर्डवरील संशयीत असून त्याच्या अटकेसाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिस उपअक्षीकांनी सांगितले.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
सोमवारी सकाळी झालेल्या घटनेनंतर जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, सहा.पोलिस निरीक्षक अमोल पवार, दशरथ राणे, विजय पोहेकर, विठ्ठल फुसे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली तसेच लुट झालेल्या व्यापार्‍याकडून नेमक्या घटनेची माहिती जाणून घेतली.

लुटीत पिस्टलचा वापर झाल्याची चर्चा
तक्रारदार विनोद बजरंग परदेशी (रा.साकेगाव) हे किराणा व्यावसायीक तसेच शेतकरीदेखील आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता ते दुचाकीने साकेगाव शिवारातील महामार्गालगतच्या शेतात भाजीपाला आणण्यासाठी निघाले असता सिनेस्टाईल दुचाकीने आलेल्या तिघा लुटारूंनी परदेशी यांची दुचाकी अडवत त्यांना मारहाण सुरू केली तसेच त्यांच्या मानेवर काहीतरी धारदार वस्तू लावून त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाच्या दोन चैन तसेच खिशातील 75 हजारांची रोकड लांबवून काही कळण्याआत पोबारा केला. लूटीत आरोपींना पिस्टलचा वापर केल्याचा अंदाज तक्रारदाराला आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, तक्रारदाराच्या मानेकर काहीतरी धारदार वस्तू लावल्याचे त्यांनी म्हटले आहे मात्र ती पिस्टल आहे का हे आत्ताच सांगता येणार नाही. आरोपींच्या अटकेनंतर या बाबींचा उलगडा होणार आहे.

पाळत ठेवून लुटीचा संशय
तक्रारदार विनोद परदेशी यांच्या शेतीसह किराणा व्यवसायासह त्यांच्या दिवसभराच्या ‘नित्यक्रमाचा’ व अंगावरील सोन्याबाबत लुटारूंना आधीपासून माहिती असल्याने त्यांनी पाळत ठेवून ही लूट केल्याचा अंदाज आहे शिवाय तक्रारदार परदेशी यांनी लुटारूंपैकी एकाचे नाव सोनू पांडे असल्याची माहिती पोलिसांना दिली असून तो देखील पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयीत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षकांनी दिली.

तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी
तक्रारदार परदेशी यांनी एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड बाळगून शेत का गाठले? तसेच लुटारू त्यांच्या पाळतीवर होते का? याची बारकाईने पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. आरोपींच्या अटकेनंतर लूट प्रकरणाचा नेमका पर्दाफाश होवून सत्य जनतेसमोर येणार आहे. परदेशी यांनी नातेवाईकांना देण्यासाठी ही रक्कम बाळगल्याचेदेखील सांगितले जात आहे. एकूणचा आरोपींच्या अटकेनंतर या सर्व घटनांचा उलगडा होणार आहे.