खासदार रक्षा खडसे यांची ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट
भुसावळ- तालुक्यातील साकेगाव येथे मंगल कार्यालय उभारणीसाठी 20 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी केली. पायाभूत सुविधांसाठी जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या साकेगाव ग्रामपंचायतीला त्यांनी सदिच्छा भेट दिली. साकेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रगतीपथावर असून आदर्श गाव म्हणून नावरुपाला आली आहे. खासदार खडसे यांनी गुरूवारी गावातील भगवान कोळी, लतीफ पटेल व प्रल्हाद सोनवणे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. द्वारदर्शनानंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी सरपंच आनंद ठाकरे यांनी गावाबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्हास्तरीय पुरस्कार व ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय नामांकनाबद्दल सांगितले मात्र मंगल कार्यालय नसल्याने काही गुणांनी हुकलेल्या पुरस्काराबद्दल खंत व्यक्त केली.
इंग्लिश मीडियम स्कूलसाठी सहकार्य
खासदार खडसे यांनी गावाची लोकसंख्या पाहता व साकेगाव हे आदर्श गाव असून प्रगतीपथावर असल्याचे सांगत जागेचे नियोजन करण्याच्या सुचना देत खासदार निधीतून 20 लाख रुपये देण्याची घोषणा केली. गावातील जिल्हा परीषद शाळेत इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबद्दल ठाकरे यांनी ग्रामस्थांतर्फे आभार मानले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सरपंच संगीता भोळे, गोलु पाटील, उपसरपंच शकील पटेल, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, सुरेश पाटील, विजय पाटील, अनंता सोनवणे, प्रवीण पवार, सुभाष कोळी, धनराज भोई, डिगंबर पाटील, साबीर पटेल, अनिल सोनवाल, संतोष भोळे, गजानन कोळी, ग्रामंपचायत सदस्या कल्पना पाटील, प्रतिभा पाटील, ग्रामसेवक राकेश मुंडके आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांमध्ये आनंद
गावात मंगल कार्यालय नसल्याने ग्रामस्थांना विवाह मंगल कार्यालयासाठी भुसावळ शहरात धाव घ्यावी लागते. खासदार खडसे यांनी मंगल कार्यालयासाठी निधी देण्याची घोषणा केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.