साकेगावातील सासु-सुनांचा वाघूर नदीत बुडाल्याने मृत्यू

0

भुसावळ : वाघूर नदीपात्रातून शेतात जात असलेल्या सासू-सुना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहिल्याची घटना तालुक्यातील साकेगाव येथे गुरुवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शोध कार्यादरम्यान सिंधूबाई अशोक भोळे (65) यांचा मृतदेह सुमारे तीन किलोमीटर अंतरावर झुडूपांमध्ये आढळला तर त्यांच्या सून योगीता राजेंद्र भोळे (35) यांचा मृतदेह सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घटनापासून पाचशे मीटर अंतरावर बंधार्‍यात सापडला.

साकेगावात हळहळ
वाघूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर वाघूर नदीला मोठा पूर आला असून त्याचवेळी सिंधूबाई व त्यांची सून योगीता या गुरुवारी पहाटे शेतात जाण्यासाठी निघाल्या असता पुराच्या पाण्यात दोघेही वाहून गेल्या. याबाबतचे वृत्त कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, एपीआय अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, जगदीश भोई, विजय पोहेकर, सरपंच व ग्रामस्थांनी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर सिंधूबाई यांचा मृतदेह आढळल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला तर त्यांच्या सून योगीता यांचा मृतदेह सायंकाळी आढळला. सिंधुबाई यांच्या पश्‍चात मुलगा आहे तर योगीता यांच्या पश्‍चात पती, मुलगा व मुलगी असल्याचे सांगण्यात आले. भुसावळ तालुका पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.