भुसावळ । तालुक्यातील साकेगाव येथे पोळा फोडताना पराभव होवून तो जिव्हारी लागल्याने एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने सणाला गावात गालबोट लागले. तालुका पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून गावात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यास रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गांधीचौक, खाटीकवाडा गावदरवाजातून बैल कुदवण्याची परंपरा आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक
या प्रकरणी दीपक पाटील यांच्या फिर्यादीवरुन चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर पाटील, भूषण पवार, संजय माकोडे यांना अटक करण्यात आली आहे. जखमी पाटील यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना 26 टाके पडले आहेत. तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील करीत आहेत.
अशी घडली घटना
दीपक उर्फ गल्लु सुरेंद्र पाटील (25) यांच्या बैलाने पोळा फोडल्याने ते मानाचे नारळ घेण्यासाठी सरपंच आनंदा ठाकरे यांच्याकडे निघाले असतानाच संशयीत सागर सुनील पाटील, भूषण सोपान पवार, नाना सुभाष सोनवणे, संजय माकोडे (सर्व रा.साकेगाव, ता.भुसावळ) यांनी फरशीचा तुकडा व क्रिकेट स्टम्पने मारहाण केली.