अनिष्ट रूढी-परंपरांना फाटा : नवीन बदलाचे साकेगावकरांनी केले स्वागत
भुसावळ- समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना फाटा देत साखरपुड्यासाठी आलेल्या वराकडील मंडळींनी समाजातील ज्येष्ठांच्या शब्दाला मान देत तालुक्यातील साकेगाव येथे साखरपुड्यानंतर विवाह उरकला. मुस्लीम समाजबांधवांनी नवीन बदलाचे उत्स्फूर्त स्वागत करीत साकेगावातील रहिवासी असलेल्या वधू-वरांना आशीर्वादही दिले. साकेगाव गावातील आसीफ नसीर पटेल व सुमैय्या इस्माईल पटेल यांचा सोमवारी दुपारी अडीच वाजता साखरपुडा समाजबांधवांच्या उपस्थितीत झाला तर यावेळी साखरपुड्यानंतर लग्नाचा प्रस्ताव ज्येष्ठांनी मांडल्यानंतर दोन्हीकडच्या मंडळींनी हा प्रस्ताव स्वीकारला.
आदर्श विवाहाचे साकेगावकरांकडून स्वागत
साकेगावातील मदिना मशिदीत नमाज-ए-असर नंतर सुन्नत व साध्या पद्धतीने निकाह (आदर्श विवाह) पार पडला. बॅण्ड-वाजा, वरात, पाहुणचार आदी गोष्टींना फाटा देत समाजबांधवांच्या साध्या पद्धत्तीने आदर्श विवाह पार पडला. दरम्यान, साखरपुडा आटोपत असताना लग्नाची तीथ 26 मार्च 2020 जवळपास निश्चित झाली मात्र साखरपुड्याच्या दुवाआधीच गावातील सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच शकील हाजी मुसा पटेल, अब्दुल अजीज हाफिज पटेल, हाजी रमजान पटेल, हाजी नूर मोहम्मद पटेल, आलिम फिरोज साहब, साबीर पटेल, पत्रकार वासेफ पटेल, शब्बीर पटेल, बिस्मिल्ला पटेल, जाबीर शेख, अमिन पटेल यांनी दोन्ही कुटुंबाला लग्न कार्यासाठी आग्रह धरला व अखेर एकमताने साखर पुढ्यातच आदर्श विवाह पार पडला. विवाह कार्यासाठी गावातील सर्व समाज बांधवांनी उपस्थिती देत वधू-वरांना आशीर्वाद दिले. दरम्यान, साकेगाव येथे मुस्लिम समाज बांधवांनी साखर पुढ्यातच लग्न करण्याची ही पहिलीच वेळ आहे, हे विशेष !