साकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा यशस्वी पाठपुरावा

भुसावळ : शासनाच्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत तालुक्यातील साकेगावसह कंडारी गावातील पाणी प्रश्न लक्षात घेऊन आमदार संजय सावकारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने कोट्यवधी रुपयांचा निधी तालुक्यातील गावांसाठी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचे साकेगावसह कंडारी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. दरम्यान, साकेगावसाठी आठ कोटी 62 लाख 15 हजार रूपये तर कंडारीसाठी 17 कोटी 89 लाख 9 हजार रुपयांच्या योजनेस राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

भुसावळच्या आमदारांचा यशस्वी पाठपुरावा
साकेगाव येथे गेल्या कित्येक वर्षापासून गावातील पाईप-लाईन जीर्णावस्थेत असल्यामुळे एमजीपी टू योजनेअंतर्गत दहा कोटी मंजूर करण्यात आले होते मात्र गावातील राजकारणामुळे ते पैसे परत गेले. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने आमदार संजय सावकारे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून योजना रेनोवेशनसाठी प्रयत्न केले होते. त्यावर आमदार संजय सावकारे यांनी सतत प्रशासनाला पत्रव्यवहार व पाठपुरावा करून भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत व कंडारी ग्रामपंचायतीचा जल जीवन मिशन योजनेत समावेश केला असून ही योजना मंजूर करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. या योजनेमुळे तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे असलेल्या साकेगाव व कंडारी गावातील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न पुढील शेकडो वर्षांसाठी मार्गी लागणार आहे

लवकरच होणार योजना कार्यान्वीत
या योजनेला नुकतीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित होईल, असा विश्वास भुसावळ तालुक्याचे लाडके आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला आहे. आमदार संजय सावकारे व गुलाबराव पाटील यांचे साकेगाव-कंडारी ग्रामस्थांनी तसेच ग्रामपंचायत कमिटी सरपंच व सदस्यांनी आभार मानले आहेत.