खासदार निधीतून मंगल कार्यालयासाठी दिला 20 लाखांचा निधी
भुसावळ- तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीला मंगल कार्यालयाच्या उभारणीसाठी 20 लाखांच्या मंजूर निधीचे पत्र खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते 13 रोजी देण्यात आले. या गावाचा सर्वांगीण विकास होईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असून सरपंच कमिटीने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या योजना पूर्णपणे अंमलात आणल्यास गावे स्मार्ट विलेज म्हणून लौकिक मिळवितात, अशीच कामगिरी साकेगाव ग्रामपंचायतीत होत असून गाव निश्चित राज्यात नावलौकिक मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आश्वासनाची केली पूर्ती ; निधी मंजुरीचे दिले पत्र
खासदारांनी मंगल कार्यालयासाठी निधी देण्याची घोषणा केली होती तर प्रत्यक्षात त्याची 13 रोजी पूर्तीही झाली. गावात खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची अतिषबाजी करीत स्वागत करण्यात आले. प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील नेहते, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक राजेंद्र नाटकर, गोलू पाटील, प्रशांत निकम आदींची उपस्थिती होती.
मतदारसंघाचा विकास हाच ध्यास -आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, संपूर्ण मतदारसंघाचा विकास हाच अजेंडा असून त्यात कुठलेही राजकारण न करता व कुठलाही पक्षपात न करता सतत निधी देण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले. साकेगाव ग्रामपंचायतीचा टप्पा दोनचा निधी खडडका येथे वर्ग झाल्याचे निदर्शनास आल्याने तत्कालीन सरपंच आनंद ठाकरे यांच्याकडून आलेल्या प्रस्तावानुसार योजना पुनर्जीवित करण्याकामी व टप्पा तीनमध्ये समावेश होणे कामी व पुनश्च निधी उपलब्ध होणे बाबत संपूर्ण प्रकरण मंत्रालयामध्ये सादर केले होते. पाठपुरावा करून तब्बल 32 कोटी 53 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगत लवकरच योजना साकेगाव व कंडारी येथे कार्यान्वित होणार असल्याचे ते म्हणाले. काही अकार्यक्षम व फोटोसेशन बहाद्दर लोक श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असून अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. लवकरच बस स्थानक जिल्हा परीषदेच्या शाळेपर्यंत रस्ता डांबरीकरण कामास सुरूवात होईल, असेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी सरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य आनंद ठाकरे, सुरेश पाटील, माणिक पाटील, दिगंबर पाटील, संतोष भोळे, अनिल सोनवाल, बळीराम सोनवणे, गजानन सपकाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील, दिलीपसिंह पाटील, व्हा.चेअरमन रामदास पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष सुभाष कोळी, दामू काका मंत्री, खडके गुरुजी, माजी सरपंच संजय पाटील यांच्यासह गावातील भारतीय जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.