साकेगाव ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार सुरू करावेत

0

भुसावळ तालुका शिवसेना संघटक प्रा.धीरज पाटील यांची मागणी : कोरोना योद्ध्यांना विश्रांतीची गरज

भुसावळ : भुसावळात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून दोन वर्षांपासून उद्घटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 27 मे रोजी उद्घाटन झाले होते. या ठिकाणी 30 बेडची व्यवस्था करण्यात आली असून भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरसाठी दोन एमबीबीएस डॉक्टरांसह आठ परीचारीका, एक वॉर्ड बॉय, एक फार्मासिस्ट अशा 12 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती तसेच अतिरीक्त चार डॉक्टर्स नियुक्त करण्यात आले असून या ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार केंद्र म्हणून लवकर सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे. निवेदनाची एक प्रत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस. चव्हाण यांना देण्यात आली आहे.

ट्रामाच्या अनेक खोल्या बंद सुविधा धूळ खात
भुसावळ परीसरात कोरोनाच्या संकटात सर्व मदार ही रेल्वे हॉस्पिटल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेंटर व इतर पालिकेच्या रुग्णालयावर आली आहे. ट्रॉमा सेंटरमध्ये डॉक्टर, स्टाफ, ऑक्सीजन व मशनरी यांची उपलब्धता आहे. विशेष म्हणजे आजतागायत येथे कोविड संबंधी एक उपचार सुरू झालेले नाही. येथे नियुक्त केलेले नोंदणी अधिकारी व फार्मासिस्ट सुद्धा उपलब्ध नसतात. खोल्या व उपचार सुविधा धूळखात आहे तर औषधीसाठी स्वतंत्र नोंदणी नसून चारचाकी गाडीतच सर्व औषधी नवोदय विद्यालयाच्या आवारातून वितरीत केल्या जातात.

डॉक्टरांचा व यंत्रणेत काम करणार्‍यांचा ताण कमी करावा
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच वेगवेगळया शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कोविडवर उपचार देणारे डॉक्टर्स व त्यांच्या परीवारातील सदस्य कोविड पॉझीटीव्ह होण्याची संख्या ही वाढत आहे. यामुळे, फक्त रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासत नाही तर इतर डॉक्टरांवरही कामाचा अतिताण येत आहे, त्यांना विश्रांतीची गरज आहे म्हणून या कोविड रुग्णांना ट्रामा सेंटर येथे उपचार देऊन तेथील सुविधेचा उपयोग करावा. इतर डॉक्टरांचा व यंत्रणेत काम करणार्‍यांचा ताण कमी करावा अशी मागणी केली आहे, असे प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले.