साकेगाव येथील जुगाराचा डाव पोलिस उपअधीक्षकांच्या उधळला : आठ जुगारी जाळ्यात

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील मटण मार्केटजवळील मोबाईल टॉवरजवळ सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई करीत आठ जुगारींच्या मुसक्या आवळल्या. घटनास्थळावरून पाच दुचाकींसह एक हजार 290 रुपयांची रोकड मिळून एक लाख 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आठ जुगारींना अटक
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक यासीन पिंजारी, हवालदार रमण सुरळकर, नाईक संकेत झांबरे, नाईक संदेश निकम, नाईक जाकीर मन्सुरी, कॉन्स्टेबल जुबेर शेख यांनी साकेगावातील मोबाईल टॉवरजवळील अड्ड्यावर छापा टाकत आठ जुगारींनी रंगेहाथ अटक केली. संशयीतांच्या पाच दुचाकींसह जुगाराची साधने तसेच एक हजार 290 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिस नाईक यासीन सत्तार पिंजारी यांच्या फिर्यादीनुसार बळीराम रघुनाथ कोळी (57, भवानी नगर, साकेगाव), रघुनाथ देविदास सपकाळे (32, कोळीवाडा, साकेगाव), नामदेव पंढरी पाटील (45, गांधी चौक, साकेगाव), मुस्लीम अहमद बागवान (54, खाटीकवाडा, साकेगाव), देवेंद्र भागवत कुंभार (35, कुंभारवाडा, साकेगाव), अशपाक मुस्ताक बागवान (38, खाटीकवाडा, साकेगाव), अनिल ओंकार काळे (48, आंबेडकर नगर, साकेगाव), समीर मोईनोद्दीन पटेल (20, आंबेडकर नगर, साकेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.