भुसावळ- तालुक्यातील साकेगाव येथे ग्रामपंचायत व जळगाव जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना आयोजित सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम्पायर मल्हारने मातृभूमीवर 10 धावांनी विजय मिळवत सरपंच पदकावर आपले नाव कोरले. अत्यंत रोमहर्षक व शेकडो दशकांच्या उपस्थितीत झालेल्या अंतिम सामन्यात एम्पायर मल्हार संघाने विजय मिळविला. तत्पूर्वी दोन्ही संघाची मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयापासून बैलगाडीत बसवून सवाद्य मैदानापर्यंत आली त्यानंतर सामन्याला सुरुवात झाला. सामना पाहण्यासाठी पंचक्रोशीतील दर्शकांनी एकच गर्दी केली होती.
विजयी संघाचा मान्यवरांनी केला गौरव
प्रथम फलंदाजी करताना एम्पायर मल्हारने 67 धावा केल्या. प्रत्युत्तरात मातृभूमी संघाने फक्त 57 धावा करू शकला. एम्पायर मल्हारतर्फे शुभम वाघने दोन षटकात 15 धावा देऊन दोन गडी बाद केले. त्यास ‘मॅन ऑफ द मॅच’ने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सचिन सोनवणे मातृभूमी, बेस्ट बॉलर पवन धनगर एम्पायर मल्हार देण्यात आले. विजय एम्पायर मल्हार संघास खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डीवायएसपी गजानन राठोड, प्रा.सुनील नेवे, पंचायत समितीचे सभापती प्रीती पाटील, सुधाकर जावळे, समाज सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, सरपंच अनिल पाटील, माजी सरपंच आनंदा ठाकरे, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, दिलीपसिंग पाटील, संजय पाटील, सुरेश पाटील, सुभाष कोळी, विलास ठोके, नरेंद्र पाटील, संतोष भोळे, अनिल सोनवाल, रमजान पटेल, राजू भोईटे, ग्रामसेवक राजेश मुडंके यांच्या उपस्थितीत देण्यात आले. विजय संघाचे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली व फोटो वर्षभरासाठी ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येणार आहे. पाच वर्षात एकही संघाने दोन वेळा सरपंच चषक पटकाविले नाही हे या स्पर्धेततील विशेष. विजयी संघास ग्रामपंचायतीतर्फे 21 हजारांचे तर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे सात हजाराचे बक्षीस देण्यात आले.