साक्रीत हमालाचा खून ; संशयीत ताब्यात

0

कारण गुलदस्त्यात ; ओळख न पटण्यासाठी चेहर्‍यावरही केला हल्ला

साक्री- शहरातील सुतार गल्ली भागातील रहिवासी व व्यवसायाने हमाल तसेच मिळेल ते काम करून गुजराण करणार्‍या प्रवीण काशीनाथ अहिरे (44) यांचा बंद असलेल्या डीसीसी बँकेजवळ गुरुवारी पहाटे मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अहिरे यांचा अज्ञात आरोपींनी मारहाण केल्याने मृत्यू झाला असून हा खून असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी भूषक दीपक सोनवणे या संशयीतास चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. समजलेल्या माहितीनुसार, प्रवीण अहिरे हा घरी असताना बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यास घरातून बाहेर बोलावण्यात आले तर दुसर्‍या दिवशी पहाटे त्याचा मृतदेह आढळला. मयताच्या उजव्या चेहर्‍याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर मारहाण केल्याने रक्तस्त्राव झाला तर गुप्तांगावर तसेच छातीवरही मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू ओढवल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी मृतदेह धुळे वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक निरीक्षक जे.बी.शिरसाठ, दीपक विसपुते, शांताराम माळी यांनी हलवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाईची दिशा ठरवली आहे. प्रवीण अहिरे यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी भूषण दीपक सोनवणे यास ताब्यात घेण्यात आले आहे. मयताच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.