साक्री। राज्य सरकारने कर्ज माफीची घोषणेचा आनंद शेतकरी वर्गात होत असतांना दुसरीकडे मात्र असमानी संकट तोंड वासून उभे आहे. साक्री तालुक्यात जून महिना संपत आला तरी पाऊस येण्याचा अंदाज दिसत नसल्याने शेतकरी व व्यापारी वर्गात चिंतेची वातावरण दिसू लागले आहे.
धरणातील पाणी साठा संपण्याच्या मार्गावर
तालुक्यातील शेतकरी शेतीची मशागत करून पेरणीच्या तयारीत असतांना मृग नक्षत्रातील पावसाने तुरळक झलक दाखविली. मात्र, पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. तालुक्यातील मालनगाव, जामखेली, लावीपाडा धरणातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून टँकर चालाकांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. बी बियाणे विक्रेते यांनी लाखो रूपयांचा माल दुकानात भरला असून ते देखील ग्राहकांच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.
पाण्याची पातळी खालावली
साक्री तालुक्यात बागायती क्षेत्र, कोरडवाहू क्षेत्र, वन परिक्षेत्र लाभले आहे. येथील पाण्याची पातळी खालावली असून झाडे झुडपांवर देखील याचा परिणाम दिसून येत आहे. शेत विहीरींची पाण्याची पातळी खालवल्याने बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला असून बरस रे माझ्या देवा अशी मूक याचना शेतकर्यांच्या चेहर्यांवर दिसू लागली आहे.