साक्री पंचायत समितीतील सहा.लेखापालासह कनिष्ठ सहाय्यक धुळे एसीबीच्या जाळ्यात

0

वैद्यकीय बिल काढण्यासाठी मागितली दोन हजारांची लाच

धुळे- जिल्हा परीषद शाळेतील उपशिक्षकाचे अपघात काळातील वैद्यकीय वेतन व रजा मंजुरीचे बिल काढण्यासाठी दोन हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या साक्री पंचायत समितीतील लेखापाल प्रदीप हरीभाऊ साबळे व लिपिक तथा कनिष्ठ सहाय्यक नंदकुमार रामदास खैरनार यांना धुळे एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अटक केली. या संदर्भात तक्रारदार शिक्षकाने तक्रार नोंदवल्यानंतर 31 रोजी लाचेची मागणी झाल्याचे सिद्ध झाले होते.

पैशांसाठी शिक्षकाचे प्रकरण ठेवले प्रलंबित
तक्रारदार हे जिल्हा परीषद शाळेचे उपशिक्षक असून 2017 मध्ये त्यांचा अपघात झाला होता तर या काळातील वैद्यकीय रजेचे वेतन (पगार) बिल व रजा मंजुरीसाठी प्रकरण साक्री पंचायत समितीमध्ये प्रलंबित होते. आरोपी खैरनार व साबळे यांनी हे बिल काढून देण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने पैसे न दिल्याने आठ महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित होते. तक्रारदाराने 31 रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर आरोपींनी दोन हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. आरोपींविरुद्ध सापळा लावण्यात आला असलातरी त्यांना त्याबाबत संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नव्हती. अखेर 11 रोजी दोघा आरोपींना अटक करण्यात आली.

यांचा कारवाईत सहभाग
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शत्रूघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, निरीक्षक महेश भोरटेकर, हवालदार नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडिले, सुधीर सोनवणे, संदीप सरग, सतीश जावरे, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, शरद काटके, प्रकाश सोनार, संदीप कदम व सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपींना बुधवारी धुळे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.